वसई:- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांवरच आता चोरांनी डोळा ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसई फाटा येथील उड्डाणपुलाखाली सोमवारी पहाटे अडीच ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान दांगट एजन्सीचे वितरण असलेली हजारो वृत्तपत्रे अज्ञात व्यक्तींनी वाहनातून येऊन लांबवल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे वृत्तपत्र वितरण व्यवस्थेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दररोजच्या ठरलेल्या नियमानुसार, प्रिंटिंग प्रेसमध्ये छपाई झाल्यानंतर सफाळे, बोईसर व इतर परिसरासाठीची वृत्तपत्रे वाहनाने वसई फाटा येथे उतरवली जातात. तेथून ती संबंधित ठिकाणांसाठी वितरीत केली जातात. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वृत्तपत्रांचे गट्टे वसई फाटा येथील उड्डाणपुलाखाली उतरवून ठेवण्यात आले होते. मात्र, पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास वितरक व वाहक गठ्ठे आणण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणाहून अनेक वृत्तपत्रांचे गठ्ठे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दांगट एजन्सीमार्फत सफाळे, पालघर, बोईसर, कासा, डहाणू, दापचरी, तलासरी, उधवा, भिलाड, वापी आणि दमण या विस्तृत विभागांमध्ये दैनिक वृत्तपत्रांचे वितरण केले जाते. अज्ञात चोरांनी अत्यंत नियोजनबद्ध रितीने वाहनातून येऊन या सर्व भागांतील वृत्तपत्रांचे गठ्ठे चोरून नेले. या चोरीमुळे केवळ आर्थिक नुकसान झाले नसून, हजारो वाचकांपर्यंत वेळेवर वृत्तपत्रे पोहोचविण्याच्या संपूर्ण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.
जवळपास २० ते ३० वृत्तपत्रांचे गठ्ठे चोरून नेले आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र वितरणाचे काम करतो मात्र पहिल्यांदाच असा धक्का दायक प्रकार घडला असल्याचे वृत्तपत्र वितरक सुनील मराठे यांनी सांगितले आहे.
या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि वृत्तपत्रांचे गट्टे चोरणाऱ्या अज्ञात चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वृत्तपत्र वितरकाकडून केली जात आहे.
