वसई: नायगाव पूर्व पट्ट्यात सातत्याने निर्माण होणाऱ्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघणार असून, पोमण येथे उभारण्यात येत असलेले १०० एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्र आगामी नोव्हेंबर अखेर पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्रासह तब्बल १५ ते २० हजार वीज ग्राहकांना अखंडित आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

​गेल्या काही वर्षांत नायगाव पूर्व भागात नागरीकरण आणि औद्योगिक वाढ झपाट्याने झाली आहे. मोठ्या निवासी सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वीज पुरवठ्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याने नवीन जोडण्या मिळण्यात अडचणी, उद्योगांना कमी दाबाने वीज मिळणे आणि वारंवार होणारा शटडाऊन, यामुळे नागरिक व उद्योजक त्रस्त झाले होते.

​सध्या या संपूर्ण परिसराला तब्बल २० ते २२ किलोमीटर दूर असलेल्या नालासोपारा येथून वीज पुरवठा केला जातो. लांब पल्ल्याच्या वाहिनीमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित होण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याची मागणी जोर धरत होती.

​याची दखल घेत महापारेषणतर्फे पोमण येथे १०० एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राची मंजुरी देऊन २३ एप्रिल २०२५ रोजी उभारणीचे कार्यादेश देण्यात आले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले होते. नुकतीच स्थानिक माजी नगरसेवक कन्हैया भोईर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महापारेषणच्या मुंबई कार्यालयात मुख्य अभियंता (प्रकल्प) सुनील सूर्यवंशी यांची भेट घेऊन या कामाचा आढावा घेतला.

​या बैठकीत उपकेंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून, नोव्हेंबर अखेर ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. हे उपकेंद्र सुरू झाल्यानंतर पोमण, कामण आणि चिंचोटी या औद्योगिक पट्ट्यासह संपूर्ण नायगाव पूर्व हायवे परिसराचा वीजप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.