वसई : वसई-विरारमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी नागरिकांच्या अडचणी मात्र अद्याप संपलेल्या नाहीत. अनेक सखल भागांतून अद्यापही पाण्याचा निचरा न झाल्याने वीजपुरवठा खंडितच आहे. परिणामी, वसईतील काही परिसरांमध्ये सलग चार ते पाच दिवसांपासून वीज गायब असल्याने स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
वसईच्या १०० फुटी रस्त्यावरील पद्मराज, पद्मश्री, ट्विंकल स्टार, पद्मलाभ आणि लक्ष्मण अपार्टमेंट या सोसायट्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वीज गुल आहे. वारंवार मागणी करूनही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने संतप्त रहिवासी आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. नागरिकांनी साचलेल्या पाण्यातच रस्त्यावर ठाण मांडून महावितरणविरोधात जोरदार आंदोलन केले.
आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तिथे संतप्त नागरिकांनी त्यांना घेरून जाब विचारला. आंदोलनातील वाढता तणाव पाहता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करावा असे सांगण्यात आले.
वसई-विरारमधील अनेक सोसायट्यांमध्ये हीच बिकट परिस्थिती आहे. साचलेले पाणी ओसरत नसल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे महावितरणचे म्हणणे असले, तरी सलग पाच दिवस अंधारात काढवे लागल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने पर्यायी उपाययोजना करून वीज देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे
