वसई:- वसईच्या नवघर येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या काही जागेत अतिक्रमण असल्याची तक्रारीनंतर अखेर आता या जागेची पुन्हा मोजणी केली जाणार आहे. या मोजणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने वसईच्या भूमीअभिलेख विभागाला मोजणीसाठी पत्र दिले आहे. या मोजणीनंतर त्याचा अहवाल हा वसईच्या प्रांत अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
वसई पश्चिमेच्या नवघर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तयार करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे काम रखडलेले होते. अखेर नव्याने सर्वेक्षण करून रुग्णालय इमारतीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार त्या जागेवर ६ मजली इमारत आणि १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे.
मात्र या जागेची थातूरमातूर आणि चुकीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा ६०.७० गुंठे जागा ही केवळ सातबारा उताऱ्यात नोंद आहे. मात्र काही जागेवर अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करण्यात आली आहेत. भूमीअभिलेख विभागाने मोजणी न करताच आराखडा केल्याची तक्रार युवा काँग्रेस नेते कुलदीप वर्तक यांनी वसईच्या प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. जेवढी जागा सातबाऱ्यावर आहे ती जागा ताब्यात घ्यावी अशी त्यांची मागणी होती.
या तक्रारींनंतर वसईचे प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पालघर, सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख यांना मोजणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानंतर आता जिल्हा शल्यचिकित्सक विभागानेही भूमीअभिलेख विभागाला मोजणी करून अहवाल सादर करावा याबाबत पत्र दिले आहे.
