वसई: वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या निर्जन रेल्वे फुलाचा प्रश्न अखेर मार्गे लागला आहे. स्थानिक समाजसेवकांनी केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची दखल घेतल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंचे पत्रे काढून तेथे काचा, सीसीटीव्ही कॅमेरे व दिवे बसविण्यात आले आहेत. वसई पश्चिमेतील रेल्वे स्थानकात पूर्व व पश्चिम परिसराला जोडणारा पादचारी पूल आहे. मात्र, इतर पुलांच्या तुलनेत हा पूल अतिशय कमी वर्दळीच्या ठिकाणी बांधण्यात आला असल्यामुळे यावरून फार कमी लोकांची ये-जा असते. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पत्रे लावून तो झाकण्यात आला असल्यामुळे या पुलावरून दिवसाढवळ्या प्रवास करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे बनले होते.
वर्तक महाविद्यालयाच्या मागील बाजूने या पुलाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी प्रवासासाठी या पुलाचा वापर करतात. मात्र, याठिकाणी गर्दुल्ले, मद्यपी व काही व्यवसायी तरुणांनी बस्तान मांडले असल्याने विद्यार्थ्यांना आणि खासकरून महिलांना व मुलींना या पुलावरून प्रवास करणे कठीण होऊन बसले होते. तसेच या पुलावर अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचा तक्रारीही समोर आल्या होत्या.
स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश मौर्या यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. मुख्यमंत्र्यांच्या दखलीनंतर प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंचे पत्रे काढण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रकाशव्यवस्था बसविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र, पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी अद्याप कायम आहे. निर्जन ठिकाण असल्याने सीसीटीव्ही आणि प्रकाशव्यवस्थेबरोबरच प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे मौर्या यांनी सांगितले. तसेच स्थानिक परिसरातील समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी ही स्वतःहून पुढे येणे गरजेचे असल्याचे मतही मौर्य यांनी व्यक्त केले आहे.
