वसई: रेल्वे प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या घटना समोर येत असतात. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करण्याच्या घटना ही समोर येत असतात. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी विविध ठिकाणच्या फटका पॉईंटवर गस्त ठेवण्यात येत आहे. विशेषतः सायंकाळच्या सुमारास अशा भागात पोलिसांकडून लक्ष दिले जात आहे.
मिररोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची हद्द आहे यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश आहे .या स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने व वसई दिवा मार्गाने ये जा करीत असतात लोकल मध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना. अनेक प्रवासी हे हातात मोबाईल घेऊन उभे असतात. अशा प्रवाशांच्या हातावर फटका मारतात व मोबाईल खाली पडताच मोबाईल घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे मोबाईल चोरीच्या घटना समोर येत असतात. तर दुसरीकडे फटका मारल्याने प्रवासी गाडीतून कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
अशा घटना वेळीच रोखणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हातावर फटका मारून चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गस्ती पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
अशा ठिकाणी आहेत गस्ती पथके.
मिरारोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलीस ठाण्याची ३१ किलोमीटरची हद्द आहे. या दरम्यानच्या भागाचे सर्वेक्षण करून संभाव्य फटका पॉईंट निश्चित केले आहेत. यात जूचंद्र ते दिवा वसई वळण, नालासोपारा कॅपिटल मॉल समोर, मिरारोड ते दहिसर या भागातील नाला अशा ठिकाणी तीन ते चार गस्ती पथके नियुक्त आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यँत विशेष लक्ष दिले जात असल्याचे वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.
प्रवाशांना ही आवाहन
वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवासी हे लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करतात. मात्र काही जण एका हातात मोबाईलचा वापर करताना ही दिसून येतात. विशेषतः ज्या भागात गाड्या स्लो होतात अशा ठिकाणी या घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रवाशांनी सुद्धा प्रवासादरम्यान लोकल दरवाज्यात हातात मोबाईल घेऊन उभे राहणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

