वसई: वसई पश्चिमेला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि चहूबाजूंना साचलेल्या साचलेल्या पाण्यामुळे वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याला मोठा तडाखा बसला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने गेल्या चार दिवसांपासून हे पोलीस ठाणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आणि कायदा-सुव्यवस्थेचे कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे.

वसई पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात वसई लोहमार्ग पोलीस ठाणे वसलेले आहे. मिरारोड ते वैतरणा ही सात रेल्वे स्थानके या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद करणे, प्रवाशांशी संबंधित तक्रारींची दखल घेणे, रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, अशा विविध जबाबदाऱ्या लोहमार्ग पोलिसांद्वारे पार पाडल्या जातात.

वसई रेल्वे स्थानक परिसर काहीसा सखल भागात असल्याने या परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसतो. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराला पाण्याने वेढा घातला आहे.रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ ला जोडणाऱ्या पायऱ्यांपर्यंत पावसाचे पाणी साचले होते, तर रेल्वे रुळही पूर्णपणे जलमय झाले होते.

याच पूरसदृश परिस्थितीचा फटका शेजारीच असलेल्या लोहमार्ग पोलीस ठाण्याला बसला. चक्क पोलीस ठाण्याच्या आतमध्ये पाणी शिरल्याने पोलीस ठाणे बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस ठाणे बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.