वसई: वसई रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या जाहिरात फलकाच्या सांगाड्यावर लोंबकळणारे लोखंडी पत्रे हटवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे या भागातून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर निष्काळजीपणे लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वारावर कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच शहरात धोकादायक पद्धतीने लावण्यात येणारे बॅनर आणि होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. याच पार्श्वभूमीवर वसई पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थिती केला होता.
वसई पश्चिम रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्याच्या मार्गावर १० ते १२ फूट उंच जाहिरात फलकाचे दोन सांगाडे उभे करण्यात आले आहेत. या फलकावर विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यात येतात. मात्र, हा जाहिरात फलकाचा सांगाडा काहीसा जुना असल्याने त्यावर असणारे लोखंडी पत्रे निखळले होते. तर लोखंडी चौकटीला अधांतरी चिकटून असणारे हे पत्रे वादळी वाऱ्यासह वेगाने हलत असल्याचे देखील काही प्रवाशांनी सांगितले होते.
याशिवाय याबाबत मंगळवार, १४ जुलै रोजी लोकसत्ताने वृत्त प्रसिद्ध करून रेल्वे प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताची दखल जाहिरात फलकांच्या सांगाड्यावर धोकादायक पद्धतीने लटकणारे लोखंडी पत्रे हटवण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरातून दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
