वसई: वेलंकन्नी येथील पवित्र मरिया मातेच्या नोव्हेनासाठी जाणाऱ्या वसई-विरारमधील हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस पूर्वकल्पना न देता सोलापूर मार्गे वळवल्यामुळे संतप्त प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

वसई विरार शहरात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत. दरवर्षी तमिळनाडूतील वेलंकन्नी येथे लाखो भाविक पवित्र मरिया मातेच्या नोव्हेनासाठी जातात. वेलंकन्नी येथील पवित्र मरिया माता यांचा वार्षिक उत्सव दरवर्षी ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. ८ सप्टेंबर हा मातेचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. या उत्सवाच्या तयारीसाठी ९ दिवसांची विशेष प्रार्थना (नोव्हेना) केली जाते.

वेलंकन्नी येथे जाणारी अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी ४ वाजता वसई रेल्वे स्थानकातून सुटणार होती. मात्र मुसळधार पावसामुळे ही गाडी सुरतपूर्वी सोलापूर मार्गे वळविण्यात आली. या बदलाची माहिती प्रवाशांना दुपारी साडेबारा वाजता संदेशाद्वारे देण्यात आल्याने वसई-विरारमधील आरक्षण केलेले हजारो भाविक वसई रेल्वे स्थानकात अडकून पडले आहेत.

“मार्ग बदलाची माहिती सकाळीच मिळाली असती तर ते सुरतला जाऊन गाडी पकडू शकले असते. मात्र उशिरा सूचना मिळाल्याने प्रवास खोळंबला आहे”, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. तसेच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट रद्द करून परतावा घेण्याचा आणि पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था स्वतः करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

तसेच काही भाविकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, “पर्यायी प्रवासाची व्यवस्था रेल्वेनेच करून द्यावी. अन्यथा आम्ही वसई रेल्वे स्थानक सोडणार नाही”,  असा इशारा देत रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला आहे.