वसई: पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेसह वसईत अद्यावत रेल्वे यार्ड तयार केले जात आहे. मात्र या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात माती भराव केला आहे. मात्र काही ठिकाणी माती भराव करताना पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बुजविले जात असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला असून यामुळे वसईत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नायगाव आणि वसई या दोन स्थानकाच्या दरम्यान उमेळमान गाव परीसर आहे. त्याच ठिकाणी रेल्वेचे यार्ड तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामा दरम्यान काही ठिकाणच्या भागात आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा निचरा ज्या नाल्यातून होत असतो ते नाल्यावर माती भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार या भागात ४ ते ५ फुटांची भरणी होणार आहे. त्याचा मोठा परिणाम पावसाळ्यातील पाणी निचरा होण्याच्या मार्गावर होण्याची भीती नागरिकांनी केली. पाणी जाण्याचे मार्ग आहेत त्याच्यामध्ये भराव केल्यामुळे माणिकपूर, बऱ्हामपूर, उमेळमान, पापडी, दत्तानी, तांदूळ बाजार याभागातील पाणी अडले जाईल असे नगरसेवक प्रकाश रॉड्रिक्स यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या अधिकाऱ्यांना तेथील काम थांबविण्यास सांगितले आहे. आधी जे पाणी जाण्याचे मार्ग आहेत ते मोकळे करण्यात यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
रेल्वे अधिकारी यांच्याकडून पाहणी
रेल्वे यार्डच्या कामादरम्यान होत असलेल्या माती भरावा दरम्यान नैसर्गिक नाले बुजविले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारी नंतर बुधवारी रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक प्रकाश रॉड्रिक्स, आशिष वर्तक व तेथील स्थानिकांनी एकत्रित पाहणी केली.
यावेळी रेल्वेने मुख्य प्रवाहाचे जे नाले आहेत ते बुजविले असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. रेल्वेच्या यार्डच्या कामाला आमचा विरोध नाही परंतु जे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग खुले राहिले पाहीजेत त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नियोजन करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.यावेळी आम्ही तो माती भराव काढून पावसाळ्यापूर्वी नाले मोकळे केले जातील असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
