वसई: पावसाळा सुरू होताच बाजारात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला. वसई विरारच्या बाजारपेठा आणि आठवडे बाजारांमध्येही अशाच पावसाळी रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तर वर्षभर या भाज्यांची वाट पाहणारे खरेदीदारही बाजारात गर्दी करू लागले आहेत. उन्हाळ्यात आणि हिवाळ्याच्या प्रमाणे हंगामी फळांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे पावसाळा सुरू बाजारात दाखल होणाऱ्या रानभाज्यांची देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. वसई विरारमधील डोंगराळ, दाट जंगलाच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी महिलांकडून या भाज्यांची खुडणी करून त्यांचे छोटे-छोटे वाटे तयार करून बाजारात विक्री केली जाते.

वसईतील पापडी, अंबाडी, पारनाका, सातिवली, तसेच विरारमधील अर्नाळा, नालासोपाऱ्यातील रेल्वे स्थानक परिसर, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम उड्डाणपूल अशा विविध ठिकाणी भाज्यांची विक्री केली जाते. तर यापैकी बहुतांश ठिकाणी वारानुसार आठवडे बाजारही भरवले जातात. या बाजारात आदिवासी महिला एका बाजूला छोटंसं दुकान मांडून रानभाज्यांची विक्री करताना दिसत आहे.

सध्या वसई विरारच्या बाजारपेठांमध्ये शेवळी आणि सुरणाच्या फुलाव्यतिरिक्त करटोली, कुर्डू, फोडशी, टाकळा, अळू (तेरी), नाली, अळंबी, बांबूचे कोंब या विविध प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तर औषधी गुणधर्म आणि नैसर्गिकरीत्या होणारी भाज्यांची वाढ यामुळे खरेदीदार मोठ्या आवडीने भाजी विकत घेत असल्याची प्रतिक्रिया विक्रेत्या महिलांनी दिली.

रानभाज्यांच्या विक्रीमुळे ग्रामीण रोजगाराला हातभार

वसई विरारमधील आदिवासी महिला वर्ग आजही रानमेवा आणि हस्तनिर्मित वस्तूंच्या विक्रीतून उत्पन्न मिळवतात. त्यामुळे उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानमेव्याची विक्री करून आदिवासी महिला स्वतःचा उदरनिर्वाह करतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी रानभाजी ग्रामीण भागातील महिलांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत ठरतात.

भाज्यांच्या किंमती:

करटोली – १०० रुपये/ प्रति वाटा
कुर्डू- २० ते ३० रुपये/ प्रति जुडी
फोडशी – ३० ते ४० रुपये/ प्रति जुडी
टाकळा – २० ते ३० रुपये/ प्रति जुडी
अळू – १० ते २० रुपये / प्रति जुडी
नाली – ३० ते ४० रुपये/ प्रति जुडी
अळंबी – २०० ते ३००/ प्रति वाटा
बांबूचे कोंब – ५० ते ६०/ प्रति वाटा