वसई:- वसईत जमीन बळकावून अनधिकृत चाळी उभारून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणूक करणाऱ्या कुख्यात भूमाफिया सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा’ याला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता या २१० गुंठे जमीन घोटाळ्याची एसआयटी व गुन्हे शाखा यांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वसई पूर्वेच्या मौजे राजावळी परिसरात सर्व्हे नंबर १४६, हिस्सा नंबर ३, सर्व्हे नंबर १४९ हिस्सा नंबर २ येथे २१० गुंठे जागा आहे.  भूमाफिया सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा याने २०२० ते २०२५ या कालावधीत संबंधित जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला. या जमिनीचा कोणताही मोबदला मूळ जमीन मालकाला न देता, आरोपीने ती जमीन परस्पर विकासकांना  विकली. इतकेच नव्हे तर, या जागेवर अनधिकृतपणे चाळींचे बांधकाम करून त्यातील खोल्यांची विक्री करत सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पथकाने  भूमाफिया रंधा याला अटक केली आहे.

या अटकेनंतर वसई विरार शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात अशाच प्रकारे जमिनी बळकावून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. २१० गुंठे जमीन घोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते टेरेन्स हँन्ड्रीकीस यांनी केली आहे.

​कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा संशय

​या व्यवहारात शासनाची मोठी स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली असून, संबंधित जमिनीवर सुमारे  कोट्यवधी रुपयांचा  गौणखनिज दंड थकीत असल्याची माहिती समोर येत आहे. हा मुद्दा व्यवहारात जाणीवपूर्वक लपवण्यात आला का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे हँन्ड्रीकीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणात केवळ आरोपीच नव्हे, तर तक्रारदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.