वसई:-वसई पश्चिमेच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर सोमवारी दुपारच्या डॉल्फिन मृत अवस्थेत आढळून आला आहे. सुमारे आठ फूट लांबीचा असून या मृत डॉल्फिनला जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून पुरण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा वसईच्या समुद्र किनाऱ्यावर मृत अवस्थेतील डॉल्फिन आढळून आले होते.
वसई पश्चिमेच्या भागात राजोडी समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने नागरिक पर्यटन व फेरफटका मारण्यासाठी येत असतात. सोमवारी दुपारी फेरफटका मारत असताना किनाऱ्यावर मृत अवस्थेत डॉल्फिन आढळून आला. या मृत डॉल्फिनची लांबी अंदाजे ८ ते १० फूट असून रुंदी सुमारे ३ फूट आहे. एवढ्या मोठ्या आकारामुळे हा डॉल्फिन दुर्मिळ प्रजातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बोटीचा धक्का लागल्यामुळे या डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, वन कर्मचारी दाखल होऊन पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने या मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरच पुरण्यात आले आहे. या पूर्वी सुद्धा भुईगाव समुद्र किनाऱ्यावर मृत अवस्थेत डॉल्फिन आढळून आला होता. या घटनेमुळे सागरी जीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
