वसई: अन्नधान्य पुरवठा विभागाने राबवलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत प्राधान्य कुटुंब शिधा लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील सुमारे ६८ हजार इतक्या शिधा लाभार्थ्यांची नावं सवलतीने धान्य मिळण्याच्या यादीतून काढून टाकली जाणार असल्याचे पुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.

अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केले जाते. वसईत यासाठी शिधावाटप केंद्र उभारण्यात आली आहेत.सध्या वसईत १८० इतकी शिधावाटप केंद्र आहेत. त्यात अंत्योदय शिधापत्रिका ३ हजार ७८५, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक १ लाख ३७ हजार ५४१ हे शिधापत्रिका धारक असून एकूण ५ लाख ५१ हजार ५० इतक्या लाभार्थ्यांना या सवलतीच्या धान्याचा लाभ दिला जात आहे.

मात्र आता राज्य सरकारने गरजू व पात्र शिधापत्रिका धारकांना सरकारी सवलतीच्या, स्वस्त धान्याचा लाभ मिळावा तसेच अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखणे व बनावट शिधापत्रिका रद्द करण्यासाठी ‘मिशन सुधार’ ही मोहीम सुरू केली आहे. वसई तालुक्यात ही पुरवठा विभागाकडून मोहिमे अंतर्गत शिधापत्रिका लाभार्थ्यांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अपात्र, बनावट, मृत, स्थलांतरित, निष्क्रिय, प्राप्तिकर भरणारे, कुटुंबात एकमेव असलेली व्यक्ती, कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांची नावे अठरा वर्षांपेक्षा कमी आहे, वाहनधारक, शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाचे अशा विविध शिधा लाभार्थ्यांची नाव त्यांच्या शिधापत्रिका प्राधान्य गटातून काढून टाकली जात आहेत असे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.वसईतील जवळपास ६८ हजार ९८२ शिधा लाभार्थ्यांची सवलतीमधून काढून ती एनपीएच मध्ये टाकण्यात येत असल्याचे सोनार यांनी सांगितले आहे. या प्रक्रियेमुळे खरोखरच जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना या जागी लाभ देण्यास मदत होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.