वसई: रेल्वेच्या मार्गिकेसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून नायगावमधील उमेळे गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नव्या सर्वेक्षणात गावातील खासगी जागा वगळण्यात आली आहे. यापूर्वी चुकीचे सर्वेक्षण झाल्यामुळे ग्रामस्थ हवालदील झाले होते. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
वाढती प्रवाशांची गर्दी, त्यामुळे होणारे अपघात याशिवाय नागरिकांना सुरळीत सुविधा मिळावी यासाठी बोरीवली आणि विरार दरम्यान नवीन रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. वसई विरार व नालासोपारा या भागात वाहिन्या टाकताना १६ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. वसई ते नायगाव दरम्यान यार्ड तयार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवलीदरम्यान नव्याने ५ आणि ५ क्रमांची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रॅकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वसई पश्चिमेकडील ५ उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत.
रेल्वेने स्थानिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केल्याने ग्रामस्थ हवालदील झाले होते. सुरवातीला उमेळे येथील भूमापन क्रमांक २१ मधील नावे बाधित क्षेत्रात देण्यात आली होती. शासकीय जागा उपलब्ध असतानाही खासगी जागा भूसंपादित केली जात असल्याने उमेळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. नागरिकांना विश्वासात न घेताच परस्पर भूसंपादन होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा ही दिला होता.
नागरिकांच्या हरकती व वाढता संताप पाहता रेल्वेने पुन्हा नव्याने सर्वेक्षण प्रक्रिया राबविली होती. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. यात उमेळे येथील भूमापन क्रमांक २१ मध्ये कोणतीही जागा संपादित केली जात नसल्याचे स्पष्टीकरण अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी रेल्वेने उमेळे येथील चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून खासगी जागा ही त्यात नमूद केली होती. त्यामुळे नेमके कोणते क्षेत्र जाते याबाबत संभ्रम होता. आता नव्याने सर्वेक्षण केले त्यात उमेळे येथील खासगी जागा जात नसल्याचे सांगण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते आशिष वर्तक यांनी सांगितले आहे.