वसई : वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या रेडिमिक्स सिमेंट कारखान्यांमुळे महामार्गावर प्रदूषणाने प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणकारी करखान्यांच्या विरोधात महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात मालजीपाडा ते ससूनवघर या भागातील २८ आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

वसई विरार मधील राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा, ससूपाडा, ससूनवघर, वर्सोवा पुला जवळ यासह अन्य भागात चाळीस हून अधिक रेडिमिक्स प्रकल्प आहेत. यातील बहुतेक कारखाने अगदी महामार्गाला लागूनच आहेत. मात्र हे प्रकल्प धारक कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन करीत नसल्याने महामार्गासह आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे.

या प्रकल्पातून उडणारे धूलिकण यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास सर्वाधिक प्रदूषण हवेत दिसून येत आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे या प्रदूषणामुळे हाल होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.प्रदूषण हे केवळ कारखान्यामुळे होत नाही तर त्यांची धोकादायक पद्धतीने होत असलेल्या वाहतुकीमुळे ही होत आहे. दररोज हजारो फेऱ्या आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या होत आहेत.त्याचा परिणाम दिसून येत आहे. या वाढत्या धुळीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात घुसमट होऊ लागली आहे. याशिवाय धूळ प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावर ही याचा परिणाम होत असल्याने यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती.

दैनिक लोकसत्ताने ही वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

शहराच्या अगदी वेशीवरच प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर वसईच्या महसुल विभागाने त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सदरठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर आतापर्यंत २८ आरएमसी प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरएमसी प्रकल्पांमुळे प्रदूषण निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने तलाठी व मंडळअधिकारी यांना संबधीत प्रकल्पांची चौकशी करून त्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहे. – डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई.

प्रदूषण नियंत्रणमंडळाकडून यापूर्वी १३ प्रकल्पांना बंदच्या नोटिसा

आरएमसी प्रकल्पातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करून त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना प्रकल्प धारकांना केल्या होत्या. मात्र त्याकडे ही प्रकल्प धारकांचे दुर्लक्ष झाल्याने प्रदूषण वाढत असल्याने ससूनवघर येथील १३ प्रदूषणकारी प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा दिल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा, ससूनवघर परिसरात आरएमसी वाहतूक करणारी वाहने ही विरुद्ध दिशेने वाहतूक करू लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यावर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. मात्र त्यानंतर ही विरुद्ध दिशेने वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.