वसई: वसईतील शिरसाड अंबाडी मार्गावर दोन भरधाव रिक्षा एकमेकांना धडकून भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी अशा एकूण ७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
वसई पूर्व आणि पश्चिम भागातून शिरसाड अंबाडी मार्ग गेला आहे. वसई पश्चिम रेल्वे स्थानक आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग अशा दोन महत्त्वाच्या ठिकाणांना हा रस्ता जोडला गेला असल्यामुळे येथून हलक्या तसेच अवजड वाहनांची त्याचबरोबर प्रवासी वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. पण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणारे वाहनचालक आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे या मार्गावर वाहने एकमेकांना धडकणे, वाहने कलंडणे, वाहनांचे अपघात होणे, अशा घटना सातत्याने समोर येत असतात.
अशीच एक घटना सोमवारी दुपारी शिरसाड अंबाडी मार्गावर घडली. यावेळी शिरसाड व पारोळ दिशेकडे जाणाऱ्या एम एच ४८ बी एफ ४०१३ व एम एच ४८सी एक्स ०५५६ या दोन प्रवासी रिक्षांमध्ये श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाजवळ जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही रिक्षांमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले. तर अपघातानंतर दोन्ही रिक्षा जागीच कोसळल्या.
या अपघातात रिक्षाचालकांसह पाच प्रवासी जखम झाले आहेत. संजय जानिवाल (४०), शैलेश पवार (३९) आणि अमित कोरडे (३०) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची मांडवी पोलिसांत नोंद करण्यात आली असून स्थानिकांच्या सहाय्याने जखमींना नजीकच्या पारोळ प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
वसई विरार शहरातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, शिरसाड-वज्रेश्वरी मार्ग, सनसिटी-गास मार्ग, नायगाव-उमेळा रस्ता अशा विविध ठिकाणी दुचाकी स्वार, चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसतात. तर नादुरुस्त रस्ते, वाहतूक नियोजनाचा अभाव, रस्तेसुरक्षा उपाययोजनांमधील दिरंगाई अशा विविध समस्यांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील महत्त्वाच्या वाहतुक मार्गांवरील अपघातात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी घडलेल्या घटना
- ७ डिसेंबर २०२५ – नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडल्याची घटना रविवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यात रोहित रमेश सिंह (२०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विघ्नेश कटकिरवा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
- २ मार्च २०२५ – नायगाववरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात असताना वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी ही पुलावरून खाली कोसळली यात तुषार जोगळे (३०) याचा जागीच मृत्यू झाला होता.तर सुजल मालपेकर (१९) व सचिन सुतार (३५) हे गंभीर जखमी झाले होते.
