वसई – वसईत विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याच्या कारणांमुळे दोन व्यक्ती मध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून झालेल्या हाणामारीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. शरीफ बरकत शेख (४७) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे.
मयत शरीफ शेख हा बांधकाम व्यावसायिक असून तो नालासोपारा येथील बाबा चाळ फॉरेस्ट नाका रोड परिसरात राहत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास शरीफ शेख हा वसईच्या खाऊगल्ली येथील मुख्य रस्त्यावरून जात होता.
याच दरम्यान जावा कंपनीचा दुचाकीस्वार अंबाडी रोड या मार्गावरून विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता. त्यावेळी शेख यांनी चुकीच्या दिशेने (राँग साईड) गाडी का चालवली? अशी विचारणा त्या दुचाकीस्वाराला केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी दुचाकी स्वाराने धक्काबुक्की केल्याने शेख रस्त्यावर कोसळले त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू झाला आहे. या घडलेल्या घटनेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीलाल जाधव यांनी दिली आहे.

