वसई: सणासुदीच्या काळात मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते. या लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने ६ भरारी पथके नियुक्त करून विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
दिवाळीनिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक नागरिक गावी जात असतात. वसई-विरार शहरांतूनही दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक मूळ गावी रवाना होतात. मात्र, एसटी महामंडळाच्या बसेस आणि रेल्वेतील प्रचंड गर्दी, तसेच ऐनवेळी आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागतो. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचे मालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करून त्यांची लूट करतात. यापूर्वीही अशा अनेक तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
नियमानुसार खासगी बसचालकांना एसटीच्या मूळ भाडेदरापेक्षा जास्तीत जास्त दीडपट (१.५ पट) भाडे आकारण्याची मुभा आहे. असे असतानाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भाडे उकळले जाते, तसेच प्रवाशांची अडवणूकही केली जाते.
या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी वसई प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणीची कडक मोहीम सुरू केली आहे. यासाठी नालासोपारा, विरार, वसई आणि महामार्ग परिसरातील मुख्य ठिकाणांवर सहा वायूवेग (भरारी) पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी अतिरिक्त भाडे आकारणी केली जात असल्याचे आढळेल, तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल. दोषी बसचालक आणि मालकांवर परवाना निलंबनासह कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिला आहे.
येथे नोंदवा तक्रार
ज्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल केले जात असेल, त्यांनी तात्काळ vasairtobuscomplain@gmail.com या परिवहन विभागाच्या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
“प्रवाशांची खासगी बसेसद्वारे होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी दिवाळीच्या काळात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. यात जे चालक किंवा ट्रॅव्हल्स मालक दोषी आढळतील, त्यांच्यावर परवाना निलंबन आणि कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.” — अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई.
