वसई: विलंबाने होणाऱ्या गॅस सिलेंडर पुरवठ्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय अंत्योदय आणि प्राधान्य गट योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन पुरवठा केला जाणारा. मात्र, केरोसिन पुरवठा फक्त वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाच केला जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे गॅस सिलिंडरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर दुसरीकडे गॅस सिलिंडर नोंदणीच्या नियमात देखील बदल करण्यात आले आहेत. नोंदणी केल्यावर शहरी भागात २५ दिवसांच्या अंतराने तर ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराने गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे.

त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी करत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन वितरीत केले जाणार असल्याचे सांगितले आहे. हे वितरण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार असून विभागाच्या निर्णयानुसार केरोसिन वितरणात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

वसई तालुक्यात सद्यस्थितीत प्राधान्य गट योजनेचे एकूण १ लाख ३७ हजार २०२ लाभार्थी आहेत. तर अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे ३ हजार ७८६  लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाचे केरोसीन वितरणाचे दर ठरले की आम्ही तालुक्यासाठी केरोसीनची मागणी करू, असे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.

स्टोव नसल्यामुळे ग्रामीण भागातच पुरवठा

गॅस संपल्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर स्टोवचा वापर केला जात असे. मात्र, नागरिकांकडे केलेल्या चौकशीनंतर वसई तालुक्यात ९० टक्के नागरिकांकडे स्टोव नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण सध्या ग्रामीण भागांसाठीच केरोसीनची मागणी केली जाणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे