वसई : वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजना राबविल्या जातात. वर्ष २०२५-२६ साठी १ हजार ४७१ एकूण लक्षांक प्राप्त झाला असून त्यापैकी ६१० घरे पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब आणि आदिवासी बांधवांना हक्काचे घर प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागातील कष्टकरी आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे. यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, शबरी आदिवासी घरकुल योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांतर्गत दरवर्षी काही घरांना मंजूरी दिली जाते. त्यानंतर ४ टप्प्यांमध्ये १ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. यात त्या कामासाठी लागणाऱ्या माहितीची समावेश असतो. वसई पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), पीएम-जनमन योजना, रमाई आवास योजना (ग्रामीण) आणि शबरी आदिवासी घरकुल योजना मिळून तालुक्यात शेकडो घरांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी वसई तालुक्याला १ हजार ९६ घरकुलांचे लक्षांक (उद्दिष्ट) देण्यात आले आहे. यापैकी १ हजार ८८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, ९०० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ६०४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता तर २४३ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ३७८ घरकुले पूर्ण झाली असून ७१८ घरकुलांचे काम विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहे.

तर विशेष मागास आणि अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी असलेल्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ अंतर्गत २५७ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी ३१ अर्ज बाद झाले, तर तालुक्याकडून ३८ अर्ज रद्द करण्यात आले. तर उर्वरित २२६ पात्र लाभार्थ्यांपैकी १८८ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यातील सर्व १८८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि १६१ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. तर ४१ लाभार्थ्यांना तिसरा हफ्ता वितरित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ६० घरकुले पूर्ण झाली असून १२८ घरांची कामे सुरू आहेत. याशिवाय, रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर केलेल्या सर्व ४ घरकुलांपैकी २ घरकुले पूर्ण झाली असून २ अपूर्ण आहेत.

शबरी घरकुल योजनेतील ९० टक्के घरे पूर्ण

शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत वसईत तालुक्यात वर्ष २०२५-२६ साठी एकूण १८३ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी सद्यस्थितीत १७० घरकुलांची कामे पूर्ण झाली असून आडणे-भिनार (२), भाताने (३), शिरवली (२), माजीवली (१), कळंब (१), मेढे (१), पारोळ (१), पोमण (१) आणि तिल्हेर (१) येथील १३ घरकुलांचे काम बाकी आहे. तर नागले, अर्नाळा, खार्डी, करंजोण, खानीवडे, रानगाव, सकवार, सायवन, शिवणसई, टोकरे आणि उसगाव या गावांतील शबरी योजनेतील सर्व मंजूर घरे पूर्ण झाली आहेत.

वाढत्या महागाईमुळे निधी अपुराच

गोरगरीब नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून सरकारकडून विविध घरकुल योजना राबविल्या जातात. पण, अलीकडच्या काळात वीट, सिमेंट, वाळू, लोखंड यांसारख्या बांधकाम साहित्याचे दर आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढला असून अनेकांना घराचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःकडचे जास्तीचे पैसे खर्चावे लागत आहेत. त्यामुळे घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

“शासनाच्या आदेशानुसार वसई पंचायत समिती अंतर्गत सर्व घरकुल योजनांची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक आणि गतीने सुरू आहे. लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांची घरे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आमचे ग्रामसेवक आणि तांत्रिक अधिकारी स्तरावर प्रयत्नशील आहेत.” – ज्योतिर्मय पाटील, विस्तार अधिकारी (सांख्यिकी).