वसई: वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून पंचायत समितीकडून जिल्हाप्रशासनाकडे ५९ बोअरवेलची मागणी करण्यात आली आहे.

वाढत्या तापमानाचा फटका वसई विरार शहराला देखील बसू लागला आहे. तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी सुयोग्य वितरण प्रणाली तसेच पाण्याचा मुबलक साठा नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी पावसाळ्याचा कालावधी वगळता ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या तीन टप्प्यात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरविले जाते.

सद्यस्थितीत वसई तालुक्यातील दहा गावांमधील एकूण ४४ पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या पाड्यांसाठी वसई पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तिसऱ्या टप्प्यांतर्गत ५९ बोअरवेलींची (कूपनलिका) मागणीसाठी जिल्हाप्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम २००९ अन्वये २०० फुटापर्यंत बोअरवेल खोदण्याची आणि त्यातून १८० फुटांपर्यंत पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो.

जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या अहवालानंतर भूवैज्ञानिकांनी ५९ जागांची पाहणी करून त्यापैकी ३७ बोअरवेलींबाबत शिफारस जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मान्यता मिळताच यासंबंधी काम सुरू केले जाईल, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे उपविभागाचे कनिष्ठ सहाय्यक सिद्धार्थ बाविस्कर यांनी दिली आहे.

या गावांसाठी बोअरवेलींची मागणी

उसगाव – ४
पारोळ – ४
सायवन – ६
नागले – ७
तिल्हेर – ९
पोमण – १४
चंद्रपाडा – २
करंजोण – ६
आडणे-भिनार – ५
शिवणसई – २