वसई: वसई तालुक्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हापरिषदेकडून ३७ बोअरवेलींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंजूर जागांवर युद्धपातळीवर बोअरवेल खोदण्याचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वसई विरारमधील शहरी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी पंचायत समिती, वसईच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात मात्र नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. सद्यस्थितीत वसई तालुक्यातील दहा गावांमधील एकूण ४४ पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.

या पाड्यांसाठी ५९ बोअरवेलींच्या मागणीचा अहवाल पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्हापरिषदेकडे सादर केला होता. जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या अहवालानंतर भूवैज्ञानिकांनी ५९ जागांची पाहणी करून त्यापैकी ३७ बोअरवेलींबाबत शिफारस जिल्हा प्रशासनाकडे पाठवली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून ३७ बोअरवेलींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे उपविभागाचे कनिष्ठ सहाय्यक सिद्धार्थ बाविस्कर यांनी दिली आहे.

बोअरवेलींच्या कामातही कंत्राटदाराची नियुक्ती

तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग वसईचे विभाग प्रमुख जयकुमार जाधव पंचायत समिती वसईचे गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत यांच्या सुचनेनुसार कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रतिदिन तीन ते चार बोअरवेल खोदण्यात येत आहेत. तसेच हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात व्हावे यासाठी हातपंप दुरुस्ती कर्मचारी मयुर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामाची गुणवत्ता व प्रगतीबाबत कार्यालय प्रमुख यांना ते अहवाल सादर करत असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.

मंजूर बोअरवेलींची यादी

उसगाव – २
पारोळ – २
सायवन – ५
नागले – ५
तिल्हेर – ५
पोमण – ७
चंद्रपाडा – १
करंजोण – ४
आडणे-भिनार – ५
शिवणसई – १