वसई:- वसई-विरार शहरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील बहुतांश भाग जलमय झाला असून, या पुराचा फटका केवळ शहरी भागालाच नाही, तर ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. दरम्यान, वसई पूर्वेकडील सकवार येथे पुरात अडकलेल्या १३ नागरिकांची प्रशासनाने वेळीच धाव घेत सुखरूप सुटका केली आहे.
वसई पूर्वेच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सकवार भागात पावसाचे प्रचंड पाणी साचले आहे. या साचलेल्या पुराच्या पाण्यात विरार येथे राहणारे १३ नागरिक अडकून पडले होते. वेगाने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे अडकलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका, तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसलीही वाट न पाहता बोटीच्या साहाय्याने मदतकार्य सुरू केले आणि पुरात अडकलेल्या सर्व १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसील विभागाने दिली आहे.
