वसई: पावसाळा अगदी तोंडावर आला असल्याने, तयार झालेले मीठ सुरक्षित ठेवण्यासाठी वसईतील मीठ उत्पादकांची मोठी लगबग सुरू झाली आहे. वसई परिसरातील विविध मिठागरांमध्ये तयार झालेल्या मिठाच्या राशींवर गवत आणि ताडपत्रीचे (कापड) आवरण घालून त्या सुरक्षितपणे बंदिस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
वसई-विरार मध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने मिठाचा व्यवसाय केला जातो. वसईतील जूचंद्र, नायगाव, उमेळे, उमेळमान, राजावळी, नवघर पूर्व, पाणजू यांसह इतर विविध भागांत मिठाचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात सातत्याने उद्भवणाऱ्या अवकाळी पावसाच्या संकटाशी सामना करत मीठ उत्पादकांनी मिठागरांची मशागत करून मीठ तयार केले होते.
साधारणपणे फेब्रुवारी ते मे महिन्याचा अखेरचा आठवडा हा मीठ उचलण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. यादरम्यान तयार झालेले मीठ व्यापाऱ्यांकडून खरेदी केले जाते. आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मिठागरात अखेरच्या क्षणी तयार झालेले मीठ सुरक्षित राहावे यासाठी उत्पादकांची धावपळ उडाली आहे. तयार केलेल्या मिठाच्या ढिगाऱ्याचे (रास) नुकसान होऊ नये, म्हणून चारही बाजूंनी त्याचे योग्य प्रकारे सपाटीकरण केले जात आहे. त्यानंतर त्यावर आधी गवताचे आणि नंतर प्लास्टिक कापडाचे आवरण घालून ते बंदिस्त केले जात असल्याची माहिती स्थानिक मीठ उत्पादकांनी दिली.
…म्हणून घटले मीठ उत्पादन!
विविध कारणांमुळे वसईतील मीठ उत्पादनात वर्षानुवर्षे घट होत असल्याचे चित्र आहे. खाड्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे समुद्राच्या पाण्यातील खारटपणा (क्षारता) कमी झाला आहे, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ आणि त्या तुलनेत बाजारात असलेली मंदी यामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.तर दुसरीकडे मिठागरात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यातच कधी कधी हवामान बदलाचाही फटका बसत असल्याचे मीठ उत्पादकांचे म्हणणे आहे.
