वसई : वसई तालुक्यातील ससूनवघर परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणांविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. सर्वे क्रमांक १८६, हिस्सा क्रमांक ‘अ’ मधील सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेले पत्रा शेड, कंपाऊंड आणि एकता ढाबा निष्कासित करण्यात आला.
महसूल विभागाने यापूर्वी संबंधित ७५ एकर क्षेत्राचा अधिकृत सर्वे करून पंचनामा केला होता. या सर्वेनंतर संबंधित भूखंड हा महसुली जमीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही एकरांवर पसरलेले अनधिकृत पत्रा शेड, कंपाऊंड तसेच एकता ढाब्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
कारवाईनंतर संबंधित जागा सरकार जमा करण्यात आली असून महसुली मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नांना महसूल प्रशासनाने आळा घातला आहे. तहसीलदार दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अरुण मुर्तडक आणि तलाठी सुशील मोराळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. महसूल विभागाने यासाठी महापालिकेकडे जेसीबीची मागणी केली होती. मात्र वेळेत यंत्र उपलब्ध न झाल्याने खासगी जेसीबीच्या साहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, ससूनवघर परिसरासह वसई पूर्व भागातील इतर शासकीय जमिनींवरही अतिक्रमण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा सर्व जागांचा शासकीय सर्वे करून अतिक्रमणे हटवावीत आणि सरकारी जमिनी नागरिकांच्या हितासाठी वापरात आणाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
