वसई: वसई विरार शहरात सर्वत्र होळी व धुळवडीच्या सणाचा उत्साह सुरू आहे. अशात वसई पूर्वेच्या सातीवली परिसरात एक अपघाताची घटना समोर आली आहे. वसई सातीवली येथील मौर्या नगर भागात सोमवारी साडे नऊच्या सुमारास एका भरधाव कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली यात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

कार चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक माहिती नुसार वाहनचालकाने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला गेल्याने कारचे नियंत्रण सुटले आणि गर्दीच्या ठिकाणी घुसली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारने रस्त्यावरील आठ ते दहा पादचाऱ्यांना धडक दिली.

या धडकेत सात ते आठ जण जखमी झाले आहे. जखमींना तेथील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घडलेल्या घटनेनंतर वालीव पोलिसांनी कार चालक मोबिन मोनिर अहमद (४९) याला ताब्यात घेतले आहे. ​वालिव पोलीस ठाण्यावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.