वसई:- वसई पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणाऱ्या सातीवली खिंडीतील रस्ता अरुंद असल्याने हा रस्ता वाहतूक कोंडीचे केंद्र बनला होता. त्यामुळे आता या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणामुळे रस्त्याच्याकडेला असलेली १६० वृक्ष बाधित होणार असून रुंदीकरणासाठी एमएमआरडीए व महापालिका यांच्या मार्फत संयुक्त मोजमाप सर्वेक्षण करण्यात आले आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा वसई अंबाडी ते सातीवली फाटा असा मुख्य रस्ता गेला आहे. वसई पूर्व आणि पश्चिम असा जोडणारा महत्त्वाचा हा मार्ग असल्यामुळे गेल्या काही काळात या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषतः सातीवली खिंडीचा रस्ता अनेक वर्षांपूर्वी डोंगर खोदून तयार करण्यात आला होता. मात्र, अवजड व अन्य वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता तो रस्ता अरुंद झाला आहे.

याशिवाय हा परिसर अपघात प्रवण क्षेत्राचा भाग असल्याने या ठिकाणी अपघाताच्या घटनाही सातत्याने घडत असतात. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या भागातील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत महापालिकेने रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, ज्या भागातून हा रस्ता जातो तो भाग वनविभागाच्या क्षेत्रात मोडतो. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठे वृक्ष आहेत. तर ३३८ मीटर लांब असलेल्या सातीवली खिंडीतील रस्त्याचे २८ मीटर इतके रुंदीकरण करताना १६० वृक्ष बाधित होत आहेत. ती स्थलांतर करूनच पुढील काम मार्गी लागणार आहे.

एमएमआरडीएमार्फत रस्ता होणार

वसई विरार शहरातील सात रस्त्यांचे एमएमआरडीए मार्फत काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यात सातीवली ते वसई या रस्त्याचा समावेश आहे. या खिंडीच्या भागाचे महापालिका व एमएमआरडीएच्या मार्फत संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण केले आहे. असे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे.