वसई : बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळकरी मुलांना ने आण करण्यासाठी ठेवलेल्या बसेस मध्ये सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी बस गाड्या, व्हॅन ही ठेवल्या जात आहेत. परंतु या मुलांची सुरक्षित रित्या वाहतूक होणे आवश्यक आहे.  काही ठिकाणी शाळेला लावण्यात आलेल्या बसेस नियमांचे व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. बदलापूर येथे शाळेत शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा…अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाचे सत्र सुरूच, वसई-विरार आणि मिरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात पोक्सो अंतर्गत ४ गुन्हे दाखल

शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी ठेवलेल्या बसेस मधून ही शाळकरी मुलांचा सुरक्षित प्रवास होतो का ? महिला मदतनीस ठेवल्या आहे की नाही याशिवाय अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत की नाही याची तपासणी करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याशिवाय काही ठिकाणी कोंबून कोंबून मुलांना व्हॅन मध्ये बसविले जाते यामुळे अपघाता सारख्या घटना समोर येत असतात.

हेही वाचा…प्रवीण धुळे हत्या प्रकरण फरार आरोपीला १६ वर्षानंतर अटक

या धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक याबाबत परिवहन विभागाकडे तक्रारी येत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बसेस व इतर गाड्या यांचे वैध विमा प्रमाणपत्र, वैध वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक- मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.