वसई: ‘मी महादेवाचा अवतार आहे’ असे सांगून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरू यांच्यावर करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश वैद्य याच्यावर वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकऱण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पीडित महिला ३५ वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार २०२३ मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी झाली होती. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात गेला.
यावेळी मी महादेवाचा अवतार आहे असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे काढली होती.
या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न केला असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, हे नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली आहे.
