वसई: वसई विरार शहराचे झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन वसई तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. नुकताच महसूल विभागाचे याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
वसईचे मुख्य तहसीलदार कार्यालय हे वसई गाव येथे आहे.विरार आणि नालासोपारा या भागातून हे कार्यालय दूरच्या अंतरावर असल्याने सर्व सामान्य नागरिकांना दाखले, जमीन महसूल आणि इतर कामांसाठी मोठा प्रवास करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी नालासोपारा किंवा विरार परिसरात स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. याशिवाय कोकण विभागीय आढावा बैठकीत ही त्यांनी हा मुद्दा मांडला होता.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देताना वसईसाठी हे स्वतंत्र कार्यालय मंजूर केले आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन कामांना गती मिळणार आहे. हे कार्यालय नेमके नालासोपारा की विरार येथे होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, यापैकी एका मध्यवर्ती ठिकाणी ते लवकरच कार्यान्वित होईल असे आमदार नाईक यांनी सांगितले आहे.
–
