वसई: दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेवळी भाजी उपलब्ध होते. मात्र, यंदा ही भाजी पावसाळ्यापूर्वीच बाजारात दाखल झाल्यामुळे खवय्यांकडून या भाजीला चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे. वसई विरारमधील जंगले, डोंगररांगा तसेच शेतीवाड्यांमध्ये दरवर्षी पावसाळा ऋतूत विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात.

दरवर्षी खवय्ये या रानभाज्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा फक्त पावसाळ्यात मिळणारी शेवळी ही प्रसिद्ध रानभाजी पावसाळ्यापूर्वीच बाजारात विक्रीस ठेवण्यात आली आहे. नैसर्गिकरीत्या रानातून उपलब्ध होणारी ही भाजी वर्षातून फक्त एकदाच मिळते. त्यामुळे तिला खूप महत्त्व आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्वमान्सून हालचालींमुळे वसई विरार शहरात पडलेल्या पावसामुळे शेवळीची वाढ लवकर सुरू झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. सध्या या भाजीच्या एका जुडीची विक्री बाजारात २५ ते ५० रुपयांना केली जात आहे. वसईतील लहान-मोठ्या बाजारपेठा, तसेच रस्त्यावर दुतर्फा भाजीविक्रेते शेवळीची विक्री करताना दिसत आहेत.

शेवळीची भाजी काहीशी दुर्मिळ असल्यामुळे तसेच वाढते शहरीकरण आणि काँक्रीटीकरण यामुळे वर्षागणिक रानभाज्या मिळणे कठीण होत असल्यामुळे ग्राहकांकडून देखील या भाजीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. शेवळीची भाजी खायला रुचकर असल्यामुळे अगदी लांबूनलांबून महिला व इतर खरेदीदार बाजारात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्रामीण विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

ग्रामीण अर्थकारणाला चालना

रानात उगणारी ही भाजी शहरी बाजारपेठा आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात ते ग्रामीण भागातील आदिवासी बांधव आणि स्थानिक रहिवासी. पावसाळ्यात जंगलात जाऊन भाजी शोधून, निवडून तिच्या नीट जुड्या बांधून त्या ग्रामीण भागातून बाजारात विक्रीस आणल्या जातात. भाजी तोडून आणणारेच या भाजीची विक्री करतात. दरवर्षी या रानभाजीमुळे रोजगाराचे एक साधन ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच आदिवासी बांधवांना उपलब्ध होते.