वसई म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं हिरवीगार झाडी, ऐतिहासिक किल्ले आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचं चित्र. पण, यासोबतच वसईची आणखी एक ओळख म्हणजे इथली खास सुकेळी. काळीशार, मऊसूत माती, मुबलक पाणी, योग्य हवामान यामुळे भाताच्या शेतीसह वसईत पूर्वीपासून केळीची लागवड केली जात आहे. पुढे याच केळीच्या लागवडीतून सुकेळींचा उगम झाला. वसईत पूर्वापार चालत आलेला आणि आजतागायत टिकलेला हा पारंपरिक व्यवसाय आहे.
बदलता काळ, हवामान बदल, घटलेले केळ्यांचे उत्पादन अशी विविध प्रकारची आव्हाने पेलून आजही अनेक कुटुंबांनी हा व्यवसाय जिद्दीने सुरू ठेवला आहे. तर सातासमुद्रापार पसरलेल्या प्रसिद्धीमुळे आज महाराष्ट्रच नव्हे अगदी परदेशातील खवय्यांना सुकेळींची भुरळ पडली आहे. त्यामुळे वसईच्या खाद्यसंस्कृतीच्या अविभाज्य भाग असणारी सुकेळी वेगळी कशी? हेच आपण जाणून घेणार आहोत.
सुकेळी म्हणजे काय?
वसईत बंगाली, सफेद वेलची, आंबट वेलची, मुठेळी, भुरकेळी, बनकेळी, हजारी, तांबडी केळी इत्यादी अनेक जातींची केळी पिकतात. मात्र, राजेळी या खास जातीची केळी उन्हात सुकवून त्यातील पाण्याचा अंश काढून आंबट-गोड चवीची सुकेळी तयार केली जातात. राजेळी केळ्यांमध्ये एक अतिशय दुर्मिळ जात आढळते, जिला स्थानिक भाषेत ‘बिन बोंडाची केळी’ म्हणतात.
या झाडाला फूल येत नाही. ही केळी फक्त ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोजक्याच उत्पादकांकडे मिळतात. तसेच ही केळी इतकी दुर्मिळ आहेत की, एका कच्च्या केळ्याची किंमत १०० रुपयांपर्यंत असू शकते. स्थानिक परिसरातील केळ्यांचे उत्पादन घटल्यामुळे अलीकडच्या काळात केरळ आणि कर्नाटक राज्यांतूनही राजेळी केळी मागवून त्यांच्यापासून सुकेळींचे उत्पादन केले जाते.
सुकेळी बनवण्याची पारंपरिक पद्धत काय ?
सुकेळी बनवणे ही एक संयमाची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात केळीचे घड सुट्टे करून एकावर एक रचून एका बंद खोलीत प्लास्टिकच्या कागदाखाली ५ ते ६ दिवस ठेवली जातात. वातावरणातील उष्णतेमुळे केली आरामात पिकतात. पण, हिवाळ्यात मात्र केली पिकवण्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते. हिवाळ्यात एका मोठ्या रांजणात केळी रचून ठेवली जातात.
नंतर त्यावर एक खोलगट मातीचे झाकण ठेवले जाते. हे झाकण तांदळाच्या तुसाने (कोंडा) भरले जाते व त्यावर चुलीतील आगीचे तीन-चार जळते निखारे ठेवले जातात. जाळ न होता दोन-तीन दिवस धुमसत राहणाऱ्या तुसाच्या वाफेमुळे केळी अगदी पिवळीजर्द होतात. केळी पिकल्यानंतर ती सोलली जातात. पण, सोलतानासुद्धा केळ्याच्या टोकावरचा भाग तुटू न देता ती अखंड सोलावी लागतात.
तरच त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. केळी सोलल्यानंतर मांडवावर ती सुकत ठेवली जातात. पूर्वी ही केळी ‘कारवीच्या’ मांडवावर वाळत घातली जात. मात्र, आता कारवीची उपलब्धता कमी झाल्याने आणि कारवीच्या कूसामुळे होणारी इजा टाळण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या मांडवाचा वापर केला जातो. त्यानंतर रोज संध्याकाळी केली गोळा करून टोपलीत भरली जातात आणि दुसऱ्यादिवशी पुन्हा उन्हात ठेवली जातात.
केळ्यांना रोज आलटूनपालटून ऊन लागल्यामुळे ६ ते ७ दिवसात त्यांना छान, काळपट, पिवळसर, तांबूस रंग चढतो. सुकेळी तयार होण्यासाठी स्थिर तापमान अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ सुकेळी उत्पादनासाठी सर्वोत्तम मानला जातो, अशी माहिती सुकेळी व्यावसायिक पायस रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.
नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम सुकेळी
सुकेळी बनवण्याचा व्यवसाय हा वसई तालुक्यातील आगाशी आणि नंदाखालजवळील परसाव या गावांमध्ये पूर्वापार केला जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात नैसर्गिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या सुकेळींसह कृत्रिम पद्धतीने बनवली जाणारी सुकेळीही बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. ओव्हन किंवा सौर पॅनेलच्या माध्यमातून ही केली सुकवली जातात.
पण, त्याच्यात नैसर्गिक पद्धतीने सुकवल्या जाणाऱ्या केळ्यांच्या तुलनेत या सुकेळींमध्ये काहीही पोषक घटक कमी असतात. तसेच कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेली सुकेळी नैसर्गिक सुकेळींप्रमाणे बारीकही होत नाहीत किंवा केळ्यांमधील रस ज्याला स्थानिक भाषेत मध म्हणतात तेही सुकेळींमध्ये उतरत नाही असे सुकेळी उत्पादकांचे म्हणणे आहे.
आर्थिक गणित आणि विक्री
पूर्वी फक्त वसई ते चर्चगेट दरम्यान भरवल्या जाणाऱ्या विविध जत्रांमध्ये आणि दादर व चर्चगेट या परिसरात असणारे दुकानदार आणि नेहमीचे खरेदीदार यांनाच सुकेळीची विक्री केली जात होती. मात्र, समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे विविध ठिकाणचे लोक सुकेळींची खरेदी करू लागली आहेत.
इतर राज्यातील केळी आणि गावठी केळ्यांपासून (वसईतील राजेळी केळी) तयार केलेली सुकेळी असे सुकेळींचे दोन प्रकार आहेत. यापैकी सुकेळी ही ६०० रुपये किलो दराने तर गावठी सुकेळी ८०० रुपये किलो दराने विकली जातात. अलीकडच्या काळात वसईतील भुईगाव आणि नालासोपाऱ्यातील नाळा या परिसरातच फक्त राजेळी केल्याची लागवड केली जाते.
त्यामुळे या केळ्यांपासून तयार केलेली सुकेळी चवीने वेगळी आणि काहीशी महाग असतात. या व्यवसायात ५ ते ६ लाखांची वार्षिक उलाढाल होते. तर व्यावसायिकांना वर्षाकाठी एक ते दीड लाखांचा नफा होतो. पण, अनेकदा कच्च्या मालातील निरूपयोगी केळी, तसेच हवामान बदलामुळे खराब होणारी सुकेळी यामुळे व्यावसायिकांना लाखोंचे नुकसानही झेलावे लागते.
आरोग्यासाठी फायदे
सुकेळी हा उर्जेचा आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. बाळंतीण महिला मुलांसाठी सुकेळी अत्यंत पौष्टिक मानली जातात. तर कंबरदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठीही ती गुणकारी आहेत. तसेच ज्यांना भूक लागत नाही किंवा सतत थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी सुकेळी एक नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे अनेकजण याला वसईचं सुपरफूड असंही म्हणतात.
सुकेळी व्यावसायिकांसमोरील आव्हाने
वसईत पार पूर्वीपासून सुकेळींचा व्यवसाय केला जात आहे. पण, हा पारंपारिक व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. बदलते हवामान, पर्यावरणातील बदल, कृत्रिम रासायनिक खतांचा अमर्याद वापर, कीटकनाशके-जंतुनाशके यांमुळे मातीचा बदललेला पोत, भूगर्भातील जलसाठ्यांचे प्रदूषण त्यामुळे शहरातील राजेळी केळीच्या उत्पादनात घट झाली आहे.
तर सुकेळीच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच व्यावसायिक हा व्यवसाय आता करत आहेत. त्यामुळे निसर्गाशी जुळवून घेत येणाऱ्या पिढ्यांमध्ये हा व्यवसाय रुजविण्याचे आव्हानही व्यावसायिकांसमोर उभे राहिले आहे.
