वसई: मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नालासोपारा वसई दरम्यान पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ही सेवा मंगळवारी रात्री कोलमडल्याने वसई-विरार परिसरातील प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामाेरे जावे लागले. विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्यामुळे आणि अनेक गाड्या केवळ वसई स्थानकापर्यंतच चालवल्या गेल्याने प्रवाशांचा संयम सुटला. मध्यरात्रीच्या सुमारास हजारो प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकावर थेट रुळांवर उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.
लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे विरार, नालासोपारा आणि पुढील भागात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला होता. तासनतास वाट पाहूनही रेल्वेकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था न झाल्याने प्रवाशांमधील संताप अनावर झाला. परिस्थिती इतकी चिघळली की, काही संतप्त प्रवाशांनी थेट लोकलच्या मोटरमनच्या केबिनला घेराव घातला आणि गाडी पुढे विरारपर्यंत नेण्याचा तगादा लावला. या अचानक उद्भवलेल्या आंदोलनामुळे वसई स्थानक परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिवसभर मुंबईत राबून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना या गोंधळाचा मोठा फटका बसला. लोकल सेवा खंडित झाल्यानंतर प्रवाशांना योग्य माहिती देण्यासाठी रेल्वेकडून कोणतीही स्पष्ट उद्घोषणा केली जात नव्हती. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी किंवा पालिकेच्या अतिरिक्त बसची कोणतीही पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केली नाही. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मध्यरात्रीपर्यंत स्थानकावर ताटकळत राहावे लागले, असा संतप्त आरोप प्रवाशांनी केला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना वेळेत पूर्वकल्पना देणे आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे होते, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
वसई-विरार मार्गावरील लोकल सेवा ही लाखो चाकरमान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे निर्माण होणारा असा अडथळा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.
