वसई : वसईत शाळेत उशिरा आल्याने उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे सहावीत शिकणाऱ्या मुलीचा झालेला मृत्यूचे प्रकरण शाळा व्यवस्थापनाला चांगलेच भोवले आहे. या घटनेच्या चौकशीनंतर श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही शाळांची सन २०२५- २६ अखेर या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शनिवारी शासनाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

वसई पूर्वेच्या  सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यामुळे एका सहावीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू झाला होता. या घडलेल्या घटनेनंतर सर्वच स्तरातून शाळेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. याशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती.

विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पालघर जिल्हापरिषद प्रशासनाकडून शाळा व्यवस्थापनाची चौकशी करण्यात आली.त्यानंतर या प्रकरणात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे ४ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२ मधील १४ (१) मधील ( ख) नुसार विद्यार्थी हितास बाधा पोहचविणे तसेच १४(१) क नुसार शासन नियमांचे उल्लंघन हनुमान विद्यामंदिर शाळा व्यवस्थापनाने केल्याचे सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले होते. परिणामी सन २०२५ – २६ अखेर पासून या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांच्याकडे केली होती.

त्यानंतर शासन स्तरावरूनही हा प्रश्न गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रमोद कदम यांनी १३ डिसेंबर २०२५ परिपत्रक जारी करीत श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था, आझादवाडी, दामुनगर, कांदिवली (पूर्व), मुंबई संचलित वसईतील श्री. हनुमंत विदयामंदिर शाळा, कुवरापाडा, सातिवली (इंग्रजी माध्यम) व (हिंदी माध्यम) या दोन्ही शाळांची मान्यता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर रद्द करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मान्यता रद्द करण्याची कारणे

विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असताना देखील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली.
शाळेत शिकविण्यासाठी असलेल्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक पात्रता निकषाप्रमाणे दिसून आल्या नाहीत.
विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा व विद्यार्थी सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही त्यामुळे शाळेला नोटीस दिली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम-२००९ नुसार या दोन्ही शाळांनी “नमुना-२” प्रमाणपत्र घेतलेले नाही.
शाळा बांधकामाला परवानगी नाही.
इयत्ता ९ वी आणि १० वी चे वर्ग मान्यता नसताना अनधिकृत पणे भरविले जात होते.
शाळांमध्ये सखी-सावित्री समिती, माता पालक संघ अशा आवश्यक समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत.

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिकाऱ्यांचे निलंबन

सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणानंतर वसईच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार ही समोर आला होता. ज्या अखत्यारीत या शाळा येतात तेथील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही या शाळेकडे दुर्लक्ष केले असल्याचे एकंदरीत दिसून आले होते. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी याची दखल घेत. याप्रकरणी प्रभारी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख अशा तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे.