वसई:- वसई तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या संदर्भात तहसील विभागाकडे नागरिकांच्या तक्रार येत आहेत. याशिवाय कामात विलंब ही केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आता तलाठी कार्यालयात तक्रार पेट्या लावण्यात याव्यात अशा सूचना तलाठ्यांना केल्या आहेत.
वसई तालुक्यात ५१ तलाठी कार्यालये आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार किंवा विविध दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. तर काही वेळा वारस नोंदी व अन्य छोटी कामे ही मार्गी लागत नाहीत असे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. नुकताच भूमिपुत्र संघटनेने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले होते.
फेरफार नोंद, वारस नोंद आणि जमिनीच्या विविध नोंदींसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अनेक अर्ज दीर्घकाळापासून प्रलंबित असून, सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती. विशेषतः स्थानिक शेतकरी आणि पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या कामांकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप आंदोलना दरम्यान केला होता.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावे यासाठी तलाठी कार्यालयात तक्रार पेटी ठेवण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.तहसीलदार कार्यालयाकडे तलाठ्यांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता.
तहसीलदारांनी प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून प्रत्येक तलाठी कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी लावणे अनिवार्य केले आहे.कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता यावी व नागरिकांच्या अडचणी सुटाव्यात या दृष्टीने निर्णय घेण्यात आला असल्याचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारीची पाहणी
तलाठी कार्यालयातील तक्रार पेटीत येणाऱ्या तक्रारी या सोडवण्यासाठी मंडळअधिकारी, किंवा तहसीलदार नियुक्त प्रतिनिधी केला जाणार आहे. त्यांच्या मार्फत या तक्रारी पाहून पुढील कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार विभागाकडून सांगण्यात आले आहे. तक्रार पेटी ही आवश्यक बाब आहे. परंतु तहसीलदार व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही तलाठी कार्यालयात भेट देऊन आढावा घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
