वसई: वसई विरार शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ३६वा कला क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. यंग स्टार्स ट्रस्टतर्फे आयोजित या महोत्सवात कला आणि क्रीडा विभागातील ८५ स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून साठ हजारपेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

वसई विरार शहराची सांस्कृतिक आणि क्रीडा ओळख असलेला ‘वसई कला क्रीडा महोत्सव’ यंदा ३६ व्या वर्षात पदार्पण करत असून २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव मोठ्या उत्साहात रंगणार आहे. यंग स्टार्स ट्रस्ट आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य सोहळ्यात यंदा ६० हजारहून अधिक स्पर्धक आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी किक व्हॉलिबॉल आणि पंजा लढविणे या दोन नवीन साहसी खेळांची भर पडल्याने महोत्सवातील रंगत अधिकच वाढणार आहे.

या सहा दिवसांच्या महोत्सवात कला आणि क्रीडा अशा दोन्ही विभागांतील एकूण ८५ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कला विभागात चित्रकला, एकांकिका, लोकनृत्य आणि रांगोळी यांसारख्या ३२ स्पर्धांतून कलाकारांच्या कल्पकतेला वाव मिळेल, तर क्रीडा विभागात कबड्डी, खो-खो, जलतरण, कराटे आणि टेबल टेनिससह ५३ प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. यंदा सांघिक खेळांमध्ये विक्रमी नोंदणी झाली असून, कबड्डीसाठी २४५ आणि खो-खोसाठी १३८ संघ मैदानात उतरणार आहेत. महिलांचा सहभागही लक्षणीय असून लाठीकाठी आणि दहीहंडी यांसारख्या पारंपरिक खेळांत महिला पथकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे.

महोत्सवाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून यंदा महानगरपालिकेची निवडणूक आणि आचारसंहितेमुळे शासकीय आर्थिक सहाय्य मिळालेले नाही. मात्र, जनसहभाग आणि देणग्यांच्या माध्यमातून हा उत्सव परंपरेप्रमाणे जोमाने साजरा केला जात आहे. विरार, नालासोपारा आणि माणिकपूर भागातून स्पर्धकांचा प्रतिसाद वाढल्याने २६ डिसेंबर रोजी सकाळपासूनच स्पर्धांच्या सत्रांना सुरुवात होणार आहे. या महोत्सवात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना स्व. मुकेश सावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कला विशेष नैपुण्य ढाल, क्रीडा विशेष नैपुण्य ढाल आणि सर्वसाधारण नैपुण्य ढाल देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी यांनी दिली.