वसईत ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारावर वाहतूक पोलिसाने कारवाई केल्याचा राग मनात धरून त्याने वाहतूक पोलीसावर दगड डोक्यात घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. अभिषेक जैसवार (२१) असे या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.
होळी व धुळवडीच्या निमित्ताने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या वाजेच्या सुमारास वसई पूर्व येथील रेंज नाका, टॉप टेन मोबाईल शॉपजवळ वाहतूक पोलीस जसवंत वळवी व पोलीस नाईक विनोद माने यांच्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू होती.
याच दरम्यान अभिषेक राजदेव जैसवार (२१) हा एम एच ४८, डी एन ४५११ या क्रमांच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. याच दरम्यान पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या विरुद्ध कारवाई सुरू केली होती. या कारवाईवरून अभिषेक याने पोलिसांच्या सोबत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की या अभिषेक याने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलून वाहतुक पोलीस जसवंत वळवी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात मारला.
यात पोलीस कर्मचारी जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपी थांबला नाही; त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने त्यांच्या डोक्यावर अनेक वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. वाहतूक पोलिसांवर कारवाई दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलीसाने दिलेल्या तक्रारी वरून वालीव पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपी अभिषेक जैसवार विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
