वसई : वसई पश्चिमेकडील पापडी, ओळंबवाडी परिसरात एका आदिवासी कामगाराला मालकाने घरी येऊन मारहाण केली. याच मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश वरखंडे असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधित मालकावर दाखल करण्यात आला आहे.
गणेश वरखंडे हा वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत असून तो मागील तीन-चार वर्षांपासून मॅलेन डिसोजा यांच्या चायनीज दुकानात काम करत होता.
गणेश याने कामाच्या बदल्यात मालकाकडून ४ हजार रुपये आगाऊ घेतले होते. मात्र तबेत ठीक नसल्याने तो काही दिवस कामावर गेला नव्हता. याच कारणामुळे ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता मालक त्यांच्या घरी आले. तेव्हा गणेश सोफ्याखाली झोपला होता.त्यावेळी त्याला बाहेर काढून पैसे न दिल्याने शिवीगाळ करीत मारहाण केली.
या मारहाणीमुळे गणेश हा मानसिक तणावात जाऊन राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे तक्रारदार प्रमोद भगली यांनी सांगितले. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी वसई पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मालकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. यावेळी मयत गणेश यांचे नातेवाईक प्रमोद भगली यांच्या तक्रारीवरूनच वसई पोलिसांनी आरोपी मॅलेन डिसोजा याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.
