वसई: गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करून आधार कार्ड सक्रिय होत नसल्याने वृद्ध वेठबिगार आदिवासी कामगार जयराम वळवी यांच्यावर उतारवयात वसई तहसील कार्यालयात ठिय्या मांडण्याची वेळ आली. त्यांच्या या भूमिकेनंतर तहसीलदारांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत आधार कार्ड सक्रिय करून दिले.
वसई तालुक्यातील मेढे येथील जयराम वळवी यांचे आधार कार्ड गेल्या दोन वर्षांपासून स्वीकारले जात नव्हते. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयापासून पालघर जिल्हा कार्यालयापर्यंत वारंवार चकरा मारल्या. मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण होत नव्हते.अखेर सोमवारी ७७ वर्षीय जयराम वळवी यांनी आपल्या दोन मुलांना सोबत घेतले आणि हातात राजदंड घेऊन तहसील कार्यालय गाठले. काम झाल्याशिवाय कार्यालयातून परत जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
यानंतर वसईचे तहसीलदार यांनी वळवी यांच्या तक्रारीची दखल घेत राज्यस्तरीय आधार यंत्रणेशी संपर्क साधून प्रकरणाचा पाठपुरावा केला. प्रशासनाच्या समन्वयातून मंगळवारी सकाळी दहा वाजता अखेर दोन वर्षांनी वळवी यांचे आधार कार्ड सक्रिय झाले.
जयराम वळवी यांची ही कहाणी केवळ एका आधार कार्डाची नाही. कधीकाळी वेठबिगारीतून मुक्त झालेल्या एका आदिवासी माणसाला वयाच्या ७७ व्या वर्षीदेखील आपल्या साध्या प्रशासकीय हक्कासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागतो, ही व्यवस्थेसाठी गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेकडून देण्यात आली आहे. तसेच लढल्याशिवाय काम होत नाही आणि आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही, हा संदेश या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
