वसई: मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तुंगारफाटा पुलाजवळील विद्युत हायमास्ट दिवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य पसरत असून अंधाऱ्या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तुंगारफाटा पुलाशेजारील रस्ता हा तुंगारेश्वर परिसर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच मुंबई आणि गुजरातहून येणाऱ्या वाहनांसाठी तुंगारफाटा महत्त्वाचा थांबा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वसईतील तुंगारफाटा पुलाजवळील हायमास्ट दिवा तसेच या भागातील महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर अंधार पसरत आहे.
तसेच वाढत्या धूळ प्रदूषणामुळे रस्त्यावरील दृश्यमानता घटल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना आणि तसेच ती वळवताना मोठी कसरत करावी लागत आहे.हायमास्ट दिवे बंद बंद असल्यामुळे वाहनचालकांप्रमाणे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली. दिव्यांअभावी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.
तर अंधारामुळे अनेकदा भरधाव वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे या भागात छोटे-मोठे अपघात घडणे नित्याची बाब बनली आहे.कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. याच कारणामुळे तुंगारफाटा येथील हायमास्ट दिवा आणि काही पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची शक्यता वाहनचालकांनी वर्तवली आहे.
तसेच दरवेळी हजारो-लाखो रुपयांचा टोल भरूनही सुरक्षित प्रवासाची हमी मिळत नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे हायमास्ट दिवे हे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. तर अंधारामुळे प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया तुंगारफाटा येथील रहिवाशांनी दिली आहे.
दिवे नसलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावावेत
तुंगारफाटा पूल तसेच महामार्गावर विविध ठिकाणी जिथे पथदिवे बंद आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाकडून रिफ्लेक्टर्स लावण्यात यावेत. यामुळे किमान वाहनांचे होणारे अपघात तरी टाळता येतील, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गुन्हेगारी वाढण्याचा धोका
तुंगारफाटा हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. इथे स्थानिक नागरिक आणि मालवाहू वाहनचालकांसह पर्यटकांचीही मोठी ये-जा असते. पण, रात्रीच्यावेळी दिव्यांअभावी होणारा अंधार यामुळे चोरी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
