वसई : अनधिकृत शाळांच्या सर्वेक्षणानंतर आता वसईच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ५६ अनधिकृत शाळांपैकी ४७ शाळांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर उर्वरित शाळांच्या विरोधात ही कारवाई सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार भागात अनधिकृत शाळांचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरातील विविध भागांमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत शाळा सुरू आहेत. काही शाळा तर दाटीवाटीच्या परिसरात अनधिकृत बांधकाम असलेल्या खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. तर काही ठिकाणी शाळांना इंग्रजी नावे देऊन त्या शाळा कॉन्व्हेंट असल्याचे भासवून पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहे.
या अनधिकृत शाळांना पायबंद घालण्यासाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाची सुरवात होण्यापूर्वी अनधिकृत केंद्र निहाय शाळांचे सर्वेक्षण सुरू केले होते. या सर्वेक्षणात ५६ शाळा या अनधिकृत असल्याचे आढळून आले होते.
या अनधिकृत शाळांना पायबंद घालण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागाने कारवाईची मोहिम जोरात सुरू केली आहे. सुरवातीला शहरातील अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाने नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतर शाळेसमोर शाळा अनधिकृत असल्याचे फलक लावणे, जनजागृती करणे असे उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र तरीही शहरात अनधिकृत शाळा सुरूच आहेत. या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत वसई तालुक्यातील ५६ पैकी ४७ शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर यातील ५ शाळांनी मान्यतेसाठी अर्ज केल्याने त्यांना मान्यता मिळाली आहे. तर कळंब येथील १ अनधिकृत शाळा बंद झाली आहे. आता २ शाळा बाकी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे वसईचे गटशिक्षण अधिकारी स्वप्नील पोल यांनी सांगितले आहे.उर्वरित शाळांविरुद्ध आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यवाहीही शिक्षण विभागामार्फत सुरू आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष व शैक्षणिक हित अबाधित राखण्यास प्राधान्य देऊन अनधिकृत शाळांविरुद्धची कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येत आहे असेही गट शिक्षण अधिकारी स्वप्नील पोल यांनी सांगितले आहे.
सर्वाधिक अनधिकृत शाळा पेल्हार मध्ये
वसईत जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांमध्ये मालजीपाडा ७, बोळींज ३, विरार २, कामण १, कळंब ५, दहिसर ८ आणि पेल्हार ३६ असा समावेश आहे. या सर्वाधिक अनधिकृत शाळा नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार भागात उभ्या राहत असून पेल्हार अनधिकृत शाळांचे केंद्र तयार होऊ लागले आहे.
कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धमकावण्याचे प्रकार
शहरात उभ्या राहत असलेल्या अनधिकृत शाळांना रोखण्यासाठी शहरात शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून त्यांची तपासणी सुरू आहे. अनेकदा शिक्षण विभागाचे पथक कारवाईला जाते अशा वेळी संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून धमकावले जात आहे. तर कारवाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. नुकताच विरार पूर्वेच्या खैरपाडा भागात एका अनधिकृत शाळेवर कारवाईसाठी गेले असता पथकाला विरोध करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर मांडवी पोलिसांच्या मदतीने त्या शाळेवर कारवाई केली असल्याने शिक्षण विभागाने सांगितले आहे.
