वसई: वसई विरार शहरात इमारती व विविध ठिकाणच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षासाधनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे इमारतीवरून मजूर खाली कोसळण्याच्या दुर्घटना सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी वसई पूर्व भागातील नवजीवन परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून २९ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे.

रंजितकुमार सुकई प्रसाद (२९) असे मयत मजुराचे नाव आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ च्या सुमारास गायत्री हॉस्पिटलसमोरील ‘हेरिटेज बिल्डिंग’च्या ११ व्या मजल्याच्या स्लॅबवर सेंट्रिंगचे काम सुरू होते. यावेळी रंजितकुमार यांच्यासोबत इतर मजूर रॉय, अमित आणि सुमित देखील काम करत होते. मात्र काम करत असताना त्याचा अचानक तोल जाऊन ११ व्या मजल्यावरून खाली पडल्याने रंजितकुमार यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी वसई-विरार शहर महापालिकेच्या नालासोपारा येथील तुळिंज-विजयनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दाखलपूर्व मृत घोषित केले. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इमारतीच्या ठिकाणी काम करण्यासाठी येणाऱ्या मजुरांना  सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच साधने पुरविली जात नाहीत व जे नियम आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत असते त्यामुळे अशा दुर्दैवी घटना समोर येत असतात अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.  या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा मजुरांची सुरक्षा व त्यांना पुरविली जाणारे सुरक्षा साधने यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात घडलेल्या घटना

५ मे २०२६ नालासोपारा येथील आचोळे रोड परिसरातील’श्वेतगंगा कन्स्ट्रक्शन’ या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून कविता साहू (२८) या मजूर महिलेचा मृत्यू .

५ ऑगस्ट २०२६ रोजी वैतरणा रोड वर एका कारखान्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता धोकादायक अवस्थेत काम करायला लावल्यामुळे २५ फूट उंचीवरून खाली पडून सुभाषचंद्र विश्वकर्मा (३३) या मजुराचा मृत्यू झाला होता.

१३ ऑगस्ट २०२६ नायगाव पूर्वेच्या भागातील ‘रश्मी स्टार सिटी’ इमारतीला रंगकाम करताना उंचावरून खाली पडल्याने सदीकुल सोहब शेख (४३) या कामगाराचा मृत्यू

२३ ऑगस्ट २०२६ वसई पश्चिमेकडील बाभोळा परिसरातील एका २२ मजली इमारतीच्या बांधकामावर पेंटिंगचे काम करताना १५ व्या मजल्यावरून खाली पडून २२ वर्षीय मुरसलीम मोमीन या मजुराचा मृत्यू झाला होता