वसई: वसई तालुक्यातील वडघर आणि आंबोडे गावातील ग्रामस्थांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमीच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी जागेच्या अभावामुळे गावातील स्मशानभूमीचे काम रखडले आहे.
वसई विरार शहरात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. टोलेजंग इमारती, मोठमोठाले रस्ते, उड्डाणपूल आणि विविध प्रकल्प शहरात उभारले जात आहेत. एकीकडे शहराचा वेगाने विकास होत असताना, दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. वसईतील मेढे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वडघर आणि आंबोडे गावात अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे.
या दोन्ही गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने गावात मयत झाल्यास त्याचे उघड्यावर अंत्यसंस्कार गावकऱ्यांना करावे लागत आहेत. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून देखील अद्याप एकाही गावात स्मशानभूमी बांधण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
ग्रामपंचायतीत वडघर गावासाठी जिल्हा नियोजनातून जन सुविधा योजनेअंतर्गत नवीन स्मशानभूमी बांधणे, कुंपण घालणे व रस्ता व दिवाबत्तीची सोय करणे यासाठी १४ लाखाचा निधी उपलब्ध झाला असतानाही या गावात जागे अभावी स्मशानभूमीचे काम रखडले आहे. तसेच आंबोडे गावात स्मशानभूमीसाठी शासनाकडून आरक्षित जागा असून ही या गावात स्मशानभूमी बांधण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तर मेढे गावात असलेली स्मशानभूमी काही कारणास्तव तोडण्यात आली असल्याने मेढे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर, मेढे व अंबोडे या तिन्ही गावातील नागरिकांना प्रचंड गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात ही समस्या अधिकच भीषण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी उभारून या समस्येतून सुटका करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत वसई पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही गावातील स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच स्मशानभूमी लवकरात लवकर उभारण्यात याव्यात यासाठी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र, स्मशानभूमीच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
वडघर गावात स्मशानभूमी बांधण्यासाठी गावातील गुरचरण जागा उपलब्ध व्हावी यासाठी तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. तसेच आंबोडे गावात स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासोबत पत्रव्यवहार सुरू आहेत. – कमलाकर कोरडे, ग्रामसेवक, मेढे ग्रामपंचायत
