वसई : वसई विरार समुद्र किनारपट्टी व खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहे. या वाळू उपाशाविरोधात आता महसूल विभागाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. नुकताच वैतरणा खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर धाड टाकून सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करणारी बोट उध्वस्त केली आहे तर वाळू, दगड वाहतूक करणारे तीन हायवा ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या खाडी पात्रात बेकायदेशीरपणे सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. विशेषतः वैतरणा खाडी,शिरगाव, जुली बेट, खानिवडे, पाचूबंदर या भागात छुप्या मार्गाने वाळू उपसा होत असतो. याचा मोठा परिणाम पर्यावरणासह बाजूच्या किनारपट्टीला बसू लागला आहे. असा वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरांवर विविध सामाजिक संघटनांनी अनेकदा तक्रारीसुद्धा केल्या आहेत. तर २०१४ साली नारंगी येथील शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यावर वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश ही महसूल विभागाला देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने अधूनमधून महसूल विभागाकडून कारवाई केल्या जात आहे.

नुकताच वैतरणा खाडीत बेकायदेशीर पणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गौण खनिज पथकाला मिळाली होती. गुरुवारी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी सक्शन पंपा बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी ती बोट उध्वस्त केली व त्यात असलेली वाळू पुन्हा खाडी पात्रात टाकून दिली.

तर दुसरीकडे याच वाळूची व दगडाची बेकायदेशीर पणे वाहतूक करणारे तीन हायवा ट्रक ही जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई जवळपास १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल उध्वस्त केला असल्याचे गौण खनिज पथकाचे नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे.कारवाईदरम्यान पथकावर प्रचंड दबाव आणण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रयत्न झाला, तरीही आमच्या पथकाने ही कारवाई केली असेही पवार यांनी सांगितले.

वाळू उपशाचा किनार पट्टीला फटका

मागील काही वर्षांपासून खाडी व नदीच्या पात्रात तसेच समुद्र किनारपट्टीच्या भागात छुप्या मार्गाने बेसुमार वाळू उपसा होऊ लागला आहे. त्यामुळे किनारा हळूहळू खचू लागला आहे. त्यामुळे पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी किनाऱ्यावर वर्षानुवर्षे राहत असलेल्या कोळीबांधवांच्या घराचा पाया खचला आहे. तसेच मासळी सुकविण्याची जागा नष्ट झाली आहे. विशेषतः वैतरणा खाडी पात्रातील  वाळू उपशामुळे शेकडो हेक्टर कांदळवन ही नष्ट झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या वाळू उपशावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.