वसई: ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा पर्यावरणाचा संदेश एका बाजूला पालिकेकडून मोठ्या थाटात दिला जात असताना, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र पालिकेलाच या संदेशाचा विसर पडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. वसई पूर्वेतील वसंत नगरी येथील मैदानाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक झाडांची खोडे आणि मुळांवर थेट सिमेंट काँक्रिटचे प्लास्टर करण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथील मैदानाच्या व उद्यानाच्या सुरक्षेसाठी सध्या पालिकेकडून संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. या मैदानाच्या सभोवताली वर्षानुवर्षे सावली देणारी, दाट झाडी आहे, जिथे स्थानिक नागरिक आणि वाटसरू विश्रांती घेतात. दुर्दैवाने, विकासाच्या नावाखाली कंत्राटदाराने सिमेंट काँक्रिट थेट झाडांच्या खोडांना चिकटवून ओतले आहे. मुळांवर आणि खोडांवर काँक्रिटचा थर साचल्याने झाडांपर्यंत हवा व पाणी पोहोचणे पूर्णपणे बंद झाले आहे. परिणामी, ही जुनी झाडे हळूहळू सुकून कोसळण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय हरित लवाद आणि न्यायालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतेही बांधकाम करताना झाडाच्या खोडाभोवती किमान १ मीटर (३ फूट) जागा मोकळी ठेवून तेथे माती राखणे बंधनकारक आहे. मात्र, वसंत नगरीत या नियमांची सर्रास पायमल्ली झाली आहे. झाडांभोवती काँक्रिटीकरण करून त्यांना मारण्याचाच हा प्रकार आहे. या बेजबाबदार कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि झाडांच्या मुळांवरील काँक्रिट हटवून ती मोकळी करावीत,अशी मागणी स्थानिक रहिवासी ॲड. अनिल चव्हाण आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
