वसई: वसई पूर्वेतील वसंत नगरी येथील मैदानाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक झाडांच्या खोडांवर आणि मुळांवर थेट सिमेंट-काँक्रिटचे प्लास्टर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर अखेर झाडांच्या मुळांवरील हा काँक्रिटचा थर पालिकेकडून हटवण्यात आला आहे.
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथील मैदान व उद्यानाच्या सुरक्षेसाठी सध्या पालिकेकडून संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. हे काम करताना कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवले होते. या मैदानाच्या सभोवताली वर्षानुवर्षे सावली देणारी दाट झाडी असून, तिथे स्थानिक नागरिक व वाटसरू विश्रांती घेतात. दुर्दैवाने, विकासाच्या नावाखाली कंत्राटदाराने थेट झाडांच्या खोडांवर आणि मुळांवरच सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम केले होते. मुळांवर आणि खोडांवर काँक्रिटचा थर साचल्याने झाडांपर्यंत हवा व पाणी पोहोचणे पूर्णपणे बंद झाले होते.
परिणामी, ही जुनी झाडे हळूहळू सुकून कोसळण्याची भीती पर्यावरणप्रेमी व स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात होती. झाडांभोवती काँक्रिटीकरण करून त्यांना मारण्याचाच हा प्रकार आहे. या बेजबाबदार कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि झाडांच्या मुळांवरील काँक्रिट हटवून ती मोकळी करावीत,अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
या गंभीर प्रकाराबाबत दैनिक ‘लोकसत्ता’ने २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘वसंत नगरी उद्यानात झाडांच्या खोडांवर प्लास्टर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. बातमी प्रसिद्ध होताच महापालिकेने तातडीने संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या. त्यानंतर झाडांच्या मुळांवरील सिमेंट-काँक्रिटचा थर हटवून झाडांची मुळे व खोडे मोकळी करण्यात आली आहेत.
