वसई: सामान्यतः फॅशन शो म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतात ती लक्झरी हॉटेल्स, महागडे डिझायनर कपडे, हाय-प्रोफाइल लाइटिंग आणि मॉडेल्सच्या हातातल्या डिझायनर बँग्स किंवा अॅक्सेसरीज. पण सध्या सोशल मीडियावर वसईच्या बाजारातील असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने या सर्व पारंपरिक संकल्पनांना फाटा दिला आहे. वसई पश्चिमेतील अंबाडी भाजी मंडईत चक्क एक अनोखा फॅशन शो पार पडला आहे.
‘व्हिजन वोग फॅशन वीक’ असे या शोचे नाव आहे. एरवी ग्राहकांच्या गर्दीने आणि भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीने गजबजणाऱ्या या भाजी मंडईत मॉडेल्सनी एकदम आत्मविश्वासाने रॅम्प वाक केला. या फॅशन शोचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते मॉडेल्सनी वापरलेले साहित्य.
महागड्या ब्रँड्सऐवजी या मॉडेल्सनी रोजच्या वापरातील ताज्या भाज्यांचा वापर अॅक्सेसरीज म्हणून केला. कोणाच्या हातात ताजा मूळा दिसत होता, तर कोणी कोथिंबिरीची जुडी हातात घेऊन दिमाखात चालताना दिसले. या हटके अंदाजाने आणि लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या या प्रयोगाने इंटरनेटवरील युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. युजर्स या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहेत. एकीकडे फॅशन आणि सामान्यांचे दैनंदिन जीवन एकत्र आणणारा हा प्रयोग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून, “कपड्यांसोबत मुळा अगदी फ्री” अशा भन्नाट प्रतिक्रियाही नेटिझन्स देत आहेत.
