वसई: वसईतून वेलंकनीला जाणारी गाडी सुरतपूर्वी सोलापूरमार्गे वळवल्यामुळे संतप्त प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला होता. प्रवाशांनी पर्यायी ट्रेनची मागणी लावून धरल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाकडून मध्यरात्री पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
वेलंकनीतील मरिया मातेच्या नोव्हेनासाठी दरवर्षी हजारो भाविक तामिळनाडूत दाखल होतात. यात वसईतील ख्रिस्ती बांधवांचाही समावेश प्रमाणावर असतो. तर सध्या मासेमारी बंदीचा काळ सुरू असल्याने वसईतील ख्रिस्ती कोळी बांधवांनी दोन महिन्यांपूर्वी वेलंकनीला जाण्याची तिकिटे आरक्षित केली होती. गुरुवारी वसईतून संध्याकाळी ४ वाजता सुटणारी अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस पकडण्यासाठी उत्तन, वसई कोळीवाडा, अर्नाळा अशा विविध भागातील रहिवासी सकाळी ११ वाजल्यापासून वसई रेल्वे स्थानकात येऊन थांबले होते.
मात्र, लोणावळा येथे रुळावर दरड कोसळल्यामुळे सुरतपूर्वी सोलापूरमार्गे ही एक्सप्रेस वळवली असल्याची माहिती प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थेची मागणी करत ९ ते १० तास ठिय्या मांडला होता. अखेर प्रवाशांची मागणी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे रेल्वे प्रशासनाने यात्रेकरूंसाठी रात्री तीन वाजता वसई रेल्वे स्थानक ते दौंडपर्यंत विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच सोलापूर येथून वळवण्यात आलेली अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस दौंड येथे थांबविण्यात आली असून वसईचे प्रवासी दौंड येथे पोहोचतच त्यांना दौंड येथे थांबविण्यात आलेल्या अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
