वसई: वसई तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय सुविधा पुरवली जाते. पण, मनुष्यबळाचा अभाव आणि अतिरिक्त कार्यभार यामुळे पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.

वसई तालुक्यात वेगाने शहरीकरण होत असले. तरी तालुक्यातील पशुधनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुसज्ज अशी पशुवैद्यकीय सुविधा पुरवता यावी, म्हणून प्रशासनाकडून आठ पशुवैद्यकीय दवाखाने आणि एक तालुका पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, या सुविधा चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.

वसई तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे मंजूर असताना फक्त ३ अधिकारी कार्यरत आहेत. तसेच रुग्णालय आणि दवाखान्यात प्रत्येकी एक पशुधन पर्यवेक्षक, बहु-कार्यकारी कर्मचारी आणि शिपाई कर्मचाऱ्याची गरज असताना सद्यस्थिती वसईत फक्त ५ पशुधन पर्यवेक्षक ,२ सहाय्यक पशुधन अधिकारी आणि २ शिपाई कार्यरत आहेत.

तसेच आजारी जनावरांचे निदान, उपचार, कृत्रिम रेतन, लसीकरण करणे, क्षेत्रभेट आणि सरकारच्या नव्या योजना व नियमांची अंमलबजावणी ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मूळ कामं असताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांना तांत्रिक कामांचा भारही झेलावा लागत आहे. तसेच शासनाने लागू केलेले २४ तासांचे कामाचे वेळापत्रक पाळतानाही कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात वसईचे पशुवैद्यकीय अधिकारीही सहभागी झाले आहेत. २ मार्चपासून या संपाला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने आंदोलन पार पडणार आहे. ७ ते ९ मार्च रोजी एकदिवसीय साखळी उपोषण केले जाणार असून त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १० मार्च रोजी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वसईतील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सामील झाले आहेत. काल काळ्या फिती बांधून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले होते. तर आज पालघर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. आंदोलन जरी सुरू असले तरी विभागाच्या कामकाजावर त्याचा परिणाम झालेला नाही, अशी प्रतिक्रिया वसईचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ नकुल कोरडे यांनी दिली आहे.